बियाण्यांची उगवण क्षमता

बियाण्यांची उगवण क्षमता



आपल्या घरचे बियाणे वापरण्यापूर्वी त्याची उगवणक्षमता तपासून घेणे आवश्‍यक आहे. उगवणक्षमता तपासण्याच्या पद्धती आणि उगवलेल्या रोपांच्या योग्य वर्गीकरणाची माहिती घेऊ

बियाण्याची उगवणक्षमता कशी तपासावी?



- बियाण्याची एखाद्या लॉटची उगवणक्षमता तपासण्यासाठी त्याच्या प्रतिकात्मक नमुन्यातील कमीत कमी 400 बी तपासावे लागते. 
- ज्या बियाण्याची उगवणक्षमता तपासावयाची आहे, त्यास कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नसावी आणि ते शुद्ध बियाण्यातूनच घेतलेले असावे. 
- प्रयोगशाळेत उगवणक्षमता तपासण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या साहित्यामध्ये उगवण कक्ष (जर्मिनेटर) हे मुख्य उपकरण आहे. यामध्ये बियाण्याच्या उगवणीसाठी आवश्‍यक लागणारे तापमान आणि आर्द्रता राखता येते, तसेच बियाणे उगवणीस ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारचा कागद वापरतात. याला "टॉवेल पेपर' असे म्हणतात. ज्यामध्ये ओलावा राखला जातो आणि त्यामुळे बियाण्याची उगवण व वाढ होण्यास मदत होते.


उगवणक्षमता तपासण्याच्या पद्धती :                                                    


1) शोषकागदाच्या वरती ः लहान आकाराच्या बियाण्यांची उगवणक्षमता याप्रकारे तपासली जाते. यामध्ये एका काचेच्या प्लेटमध्ये खाली कापसाचा पातळ थर ठेवून त्यावर शोषकागद ठेवला जातो. त्यावर पाणी टाकून ओले करावे. पाणी जास्त झाले असेल तर ते निथळून घ्यावे. अशा प्लेटमध्ये बी मोजून ठेवावे. त्यावर झाकण ठेवून ओलावा टिकून राहील याची काळजी घ्यावी. या प्लेट उगवण कक्षामध्ये (जर्मिनेटरमध्ये) उगवणीसाठी ठेवाव्यात किंवा चांगल्याप्रकारे आर्द्रता (70 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त) असलेल्या बंद खोलीत ठेवल्या तरी उगवण होण्यास पुरेसे होते. 




2) कागदाच्या मध्ये बियाणे ठेवून उगवणक्षमता तपासणे ः उगवणक्षमता तपासण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या दोन ओल्या केलेल्या कागदांमध्ये (टॉवेल पेपर) बी मोजून ठेवावेत. असे कागद गोल गुंडाळी करून त्यावर मेणकागद (वॅक्‍स पेपर) खालच्या 3/4 भागास गुंडाळून ती उगवणीसाठी आवश्‍यक असणाऱ्या तापमान आणि आर्द्रता असलेल्या जर्मिनेटरमध्ये ठेवतात. ओला कागद बोटाने दाबला असता बोटाभोवती पाणी दिसू नये इतपतच कागद ओला असावा. 

3) वाळूमध्ये उगवणक्षमता पाहणे ः कुंडी किंवा ट्रेमध्ये असलेल्या ओल्या वाळूत एक ते दोन सें.मी. खोलीवर सारख्या अंतरावर मोजून बी ठेवावेत. बियांच्या आकारमानावर वाळूचा ओलेपणा ठरवतात. अशा कुंड्या जर्मिनेटरमध्ये उगवणीसाठी ठेवतात. 
बियाणे उगवणीसाठी ठेवताना ते एकसारख्या अंतरावर ठेवावे. त्यासाठी ओलावा प्रमाणातच ठेवावा. तसेच बियाण्यास आवश्‍यक असणारे तापमान आणि आर्द्रता राखण्याचा प्रयत्न करावा. साधारण आठ-10 दिवसांत बियाण्यांची उगवण होते.   


पोत्या वर बियांची उगवण क्षमता तपासणी करते वेळेस



उगवलेल्या रोपांचे वर्गीकरण :


उगवणक्षमता चाचणीत आठ-10 दिवसांत बियाणे उगवणे. या उगवलेल्या रोपांच्या वाढीवरून त्याचे वर्गीकरण केले जाते. 
साधारण किंवा चांगली रोपे :
ज्या रोपांची चांगली वाढ झालेली असते आणि ज्यांची अनुकूल परिस्थितीत चांगल्या झाडामध्ये रूपांतर होण्याची क्षमता असते, त्यांना साधारण किंवा चांगली रोपे असे संबोधले जाते. 
या रोपांच्या सर्व भागांची वाढ व्यवस्थित झालेली असते. मुळांची वाढ चांगली होऊन त्यावर तंतूमुळे वाढलेली असतात. व्यवस्थित वाढलेली रोपे परंतु थोडी मुळांची खुरटलेली वाढ अशी रोपेसुद्धा साधारण किंवा चांगल्या प्रकारात मोडतात. तसेच व्यवस्थित वाढलेली रोपे, परंतु त्यांना बाहेरील बुरशीचा संसर्ग झाला असला तरी अशी रोपेसुद्धा चांगल्या प्रकारात मोडतात.


विकृत रोपे :


दुसऱ्या प्रकारची रोपे ही विकृत असतात आणि अशी रोपे अनुकूल परिस्थितीतसुद्धा व्यवस्थित वाढू शकत नाहीत. पूर्ण झाडांमध्ये वाढ होण्याची क्षमता त्यांच्यात नसते. त्यांच्या कोंब आणि मुळांना इजा पोचलेली असते, तसेच बियाण्यांशी निगडित असलेल्या बुरशीमुळे रोपे कुजण्याच्या अवस्थेत असतात.


कठीण बी :


तिसरा प्रकार हा न उगवलेल्या बियाण्याचा असतो. असे बी उगवणीला ठेवल्यानंतर आठ-10 दिवस अजिबात उगवत नाहीत. ज्यामध्ये काही बियाणे पाणी न शोषल्यामुळे उगवत नाहीत. यांनाच कुचर किंवा कठीण बी म्हणतात; परंतु काही बी हे त्याच्या सुप्त अवस्थेत असल्यामुळे उगवत नाहीत. काही बी हे मेलेले असते. पोकळ बियाणे, किडलेले बियाणे, गर्भ नसलेले बियाणे हे सर्व याच प्रकारात मोडतात.

अशा प्रकारे उगवलेल्या बियाण्यांची वर्गवारी करून साधारण किंवा चांगल्या उगवलेल्या बियांची टक्केवारी काढतात. प्रत्येक पिकामध्ये प्रमाणीकरण यंत्रणेने उगवणीची टक्केवारी प्रमाणित केलेली आहे. प्रमाणकापेक्षा जास्त उगवण असलेले बियाणेच पेरणीसाठी वापरावे. 
- उगवणीच्या टक्केवारीमध्ये 10 टक्‍क्‍यांपर्यंत कमी उगवण असल्यास एकरी ठरवून दिलेल्या बियाण्यापेक्षा 10 टक्के जास्त बियाणे वापरावे. परंतु त्यापेक्षा कमी उगवणक्षमता असल्यास असे बियाणे वापरू नये. 

-पेरणीसाठी वापरावयाच्या बियाण्यांचे शेतकऱ्यांनी परीक्षण करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी जवळील बीज प्रयोगशाळा, कृषी महाविद्यालये, कृषी विद्यालये, कृषी विज्ञान केंद्रे व कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधून वापरण्यात येणाऱ्या बियाण्यांची उगवणशक्ती तपासून घ्यावी. 
- घरच्या घरी ओल्या पोत्यामध्ये वाळू (बारीक रेती), शोष कागदामध्ये अशा प्रकारची उगवण परीक्षा घेऊन बियाण्यांची उगवणक्षमता तपासून पाहू शकता. ज्या बियाण्यांची उगवणक्षमता प्रमाणित प्रमाणकापेक्षा जास्त आहे तसेच बियाणे पेरणीसाठी वापरावे. 

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा   👉👉👉👉👉👉👉👉>:-   Youtube :- https://youtu.be/4-cB3Nyy1Fw
Facebook :-  https://fb.watch/dBm5hTJE53/ 






अल्पखर्चिक शेती बद्दल अधिक माहिती जाणुन घेण्यासाठी "Mr.Amit Mhetre अल्पखर्चिक शेती" या Youtube व Facebook पेज ला Follow& Like करायला विसरु नका तसेच इतर शेतकर्‍यांना हि पाठवा Facebook https://www.facebook.com/watch/?v=234878550920185          You tube :- https://youtu.be/pSYYz5zu2DE        धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻

Comments

Popular posts from this blog

🌧️ खरीपाच्या तयारीसाठी बिजप्रक्रियेची वेळ आलीय!

बैलगाडी शर्यत

तुम्हाला कोणती सापळा पिके माहित आहेत? ती कोणत्या किडीच्या नियंत्रणासाठी मदत करतात?