कांदा पिकामध्ये कोणते रोग दिसून येतात?

  कांदा पिकामध्ये कोणते रोग दिसून येतात?

कांदा पिक हे महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये जास्त प्रमाणात तर काही भागात कमी प्रमाणात घेतले जाते.पण इतर पिकाप्रमाणे या पिकामध्येहि वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. कांदा पिकावर प्रामुख्याने मर, काळा करपा, पांढरी सड, मूळकूज, सूत्रकृमी, तपकिरी करपा, केवडा, मानकूज, काळी बुरशी, निळी बुरशी, विटकरी सड, काजळी आदी रोग पडतात.

*मररोग:-* हा रोग स्क्लेरोशियम रॉल्फसी नावाच्या बुरशीमुळे होतो. यामुळे रोपे पिवळी पडतात. जमिनीलगतच्या रोपांचा भाग मऊ पडतो आणि रोपे कोलमडतात व नंतर सुकतात. या रोगामुळे रोपांचे 10 ते 90 टक्के नुकसान होते. खरीप हंगामातील हवामान या रोगास अनुकूल असते. अधिक आर्द्रता व 24 ते 30 अंश सें. तापमान या रोगाच्या बुरशीच्या वाढीस उपयुक्त ठरते.

*पांढरी सड:-* हा रोग स्क्लोरोशियम रॉल्फसी या बुरशीमुळे होतो. ही बुरशी पुर्नलागण केलेल्या रोपांच्या मुळावर वाढते. रोपांची किंवा झाडांची पाने जमिनीलगत सडतात. पानांचा वरचा भाग पिवळा पडतो. वाढणार्‍या कांद्याला मुळे राहत नाहीत. कांद्यावर कापसाप्रमाणे बुरशी वाढते. त्यावर पांढरे दाणे तयार होतात. कांदा सडतो. पांढर्‍या सडीचा प्रादुर्भाव पुर्नलागवडीनंतर लगेच झाला तर कांदा पोसत नाही. कांदा तयार झाला असेल तेव्हा कांदा सडतो. खरीप तसेच रब्बी हंगामातही या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. पाण्याचा निचरा चांगला न होणार्‍या शेतात या रोगाची तीव्रता अधिक असते. या रोगामुळे 50 ते 60 नुकसान होऊ शकते. या रोगाची बुरशी जमिनीत बरीच वर्षे राहू शकते.

*मूळकुज:-* हा रोग बहुतेक कांदा उत्पादक भागात आढळतो. विशेषत: अधिक तापमान आणि आर्द्रता असणार्‍या भागात या रोगाची तीव्रता अधिक असते. हा रोग फ्युजेरियम ऑक्सिस्पोरम या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे कांद्याची पाने पिवळी पडतात व पिवळेपणा बुडख्याकडे वाढत जातो. नंतर पाने सुकून कुजतात. महाराष्ट्रात खरीप हंगामात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात या रोगाची तीव्रता सर्वाधिक असते.

*कंद व खोड कुजविणारे सूत्रकृमी:-* डिटीलिंकस डिपसॅसी या नावाच्या सूत्रकृमीमुळे कंद किंवा खोड कुजते. झाडाच्या कोणत्याही अवस्थेत सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. सूत्रकृमींचा प्रसार कांद्याचे बी, कांद्याच्या पाती, सडके कांदे यामार्फत होतो. कृमींचा प्रादुर्भाव झाला तर कंदाच्या वरच्या भागाजवळील म्हणजे मानेजवळील पेशी मऊ होतात. हळूहळू कृमी कांद्यामध्ये शिरतात. त्यामुळे पेशी मऊ होऊन सडतात व कांद्याला एक प्रकारचा घाण वास येतो. महाराष्ट्रात खरीप हंगामात पाण्याचा निचरा न होणार्‍या जमिनीत नुकसान जास्त होते.

*करपा:-* अल्टरनेरिया पोराई या नावाच्यामुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव आर्द्र हवामान, तापमान 28 ते 30 अंश सें. आणि आर्द्रता 80 ते 90 टक्के असल्यास मोठ्या प्रमाणात होते. एकसारखा पाऊस किंवा ढगाळ वातावरण असल्यास रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. हा रोग कांद्याची पात तसेच फुलांच्या दांड्यांवर येतो. या रोगाची तीव्रता खरीप हंगामात अधिक राहते. दोन ते तीन वर्षासाठी फेरपालट करावी.

*केवडा:-* परनोस्पोरा डिस्ट्रक्टर या नावाच्या बुरशीमुळे केवडा रोग होतो. सर्वप्रथम झाडाच्या पानांवर किंवा फुलांच्या दांड्यावर पाच ते सहा इंच लांबीचा भुरी पिवळसर पांढरट डाग दिसतो. सकाळच्या दवामध्ये डाग चटकन उठून दिसतो. पाने नंतर पिवळसर होतात. चट्टे किंवा डाग पडलेल्या भागापासून पाने किंवा फुलांचे दांडे वाकतात. कांद्याची वाढ नीट होत नाही.
संदर्भ : शेतीमित्र मासिक (कांदा विशेषांक)

Comments

Popular posts from this blog

बैलगाडी शर्यत

तुम्हाला कोणती सापळा पिके माहित आहेत? ती कोणत्या किडीच्या नियंत्रणासाठी मदत करतात?

मित्रकीटक शेतीसाठी कसे फायदेशीर आहेत?