ऊसामध्ये कोणती आंतरपिके घ्यावीत ?
ऊसामध्ये कोणती आंतरपिके घ्यावीत?
सुरू उसाची लागवड १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी पर्यंत केली जाते. भाजीपाल्याची, वेलवर्गीय पिके, कडधान्याची, तेलबियाची, कंदवर्गीय, हिरवळीच्या खतांची आंतरपिके घ्यावीत.
*ऊस + भाजीपाला लागवड पद्धत:-*
भारी जमिनीत ४.५ फूट किंवा ६ फूट अंतरावर उसाची लागण सरीमध्ये केल्यानंतर दुसरे पाणी (आंबवणी) देण्याच्या अगोदर वरंब्याच्या बगलेत आंतरपिकाची टोकन पद्धतीने लागण करावी. नवलकोल, ब्रोकोली, पानकोबी व फुलकोबी रोपे लागण सरीच्या शिगेवर करावी.
*ऊस + भुईमूग आंतरपीक:-*
भुईमुगाची टोकणी ऊस लागण झाल्यानंतर ५ ते ६ दिवसांनी म्हणजे जमीन वाफश्यावर असताना सरीच्या एका बगलेस करावी. भुईमुगाच्या दोन रोपात १० सें.मी. अंतर ठेवून एका ठिकाणी एकच बी टोकावे. भुईमूग या आंतरपिकास ऊस पिकाव्यतिरिक्त भुईमुगाच्या क्षेत्रानुसार हेक्टरी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद या प्रमाणात द्यावे. भुईमूग या आंतरपिकापासून हेक्टरी ९ ते ११ क्विंटल वाळलेली शेंग मिळते.
*ऊस + कांदा:-*
उसामध्ये कांद्याच्या रोपांची लागण सरीच्या दोन्ही बाजूस १० ते १५ सें.मी. अंतरावर ऊस लागण केल्यानंतर ५ ते ६ दिवसांनी करावी. म्हणजे उसाला आंबवणीचे पाणी देण्याची वेळ व कांदा लावण्याची वेळ साधता येईल. कांद्यास ऊस पिकाव्यतिरिक्त हेक्टरी ५० किलो नत्र व २० किलो स्फुरद द्यावे. खताचा संपूर्ण हप्ता व अर्धे नत्र कांदा रोपे लागणीच्या वेळी द्यावे. राहिलेले नत्र ३० ते ३५ दिवसांनी द्यावे. कांद्याचे पीक ३.५ ते ४ महिन्यापर्यंत काढणीस तयार होते. कांद्याचे उत्पन्न हेक्टरी १० ते १२ टन मिळू शकते.
कांदा, लसूण, बीटरूट लावताना दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. व दोन रोपातील अंतर १० सें.मी. ठेवावे. या पद्धतीने जर आंतरपिकांची लागण केली तर उसाच्या उत्पन्नात विशेष घट न येता कांद्याचे उत्पादन हेक्टरी १२ टन, लसणाचे उत्पादन हेक्टरी ४.७५ क्विंटल व बीटचे उत्पन्न हेक्टरी २ टन मिळू शकते. मात्र या आंतरपिकासाठी उसाव्यतिरिक्त आवश्यक असलेली जादा खत मात्रा द्यावी लागते.
*सुरू हंगामातील उसामधील आंतरपिके:-*
*भाजीपाल्याची पिके:-*
कांदा, भेंडी, चवळी, गवार, राजमा, घेवडा, पालक, मेथी, पालक, कोथिंबीर, टोमॅटो, मिरची, पानकोबी, फुलकोबी नवलकोल, ब्रोकोली
*वेलवर्गीय पिके:-*
टरबूज, कलिंगड, काकडी, दोडका, कारली, दुधीभोपळा
*कडधान्याची पिके:-*
सोयाबीन, मूग, उडीद
*तेलबिया पिके:-*
भुईमूग, सूर्यफूल
*कंदवर्गीय पिके:-*
गाजर, मुळा, लालबीट
*हिरवळीच्या खतांची पिके:-*
ताग, धैंचा, चवळी
स्रोत:--शेतकरी मासिक
अमितकुमार मेहञे
Comments
Post a Comment