सुत्रकृमीमुळे पिकाचे कश्या प्रकारे नुकसान होते?

   
    सुत्रकृमीमुळे पिकाचे कश्या प्रकारे नुकसान होते?

*सूत्रकृमी(निमेटोड्स):-* 
  हा पिकांचे नुकसान करणारा अतिसूक्ष्म धाग्यासारखा लांबट जीव असून त्याची सरासरी लांबी ०२ ते ०.५ मि.मी. असते. तो डोळ्यांनी दिसत नाही. त्याला जगण्यासाठी प्रामुख्याने ओलावा व पिकांची जरुरी असते. जमिनीतील मातीच्या कणांच्या पोकळीत त्याचे वास्तव्य असते. तो जमिनीत अगर झाडांची मुळे जमिनीलगत खोडाच्या अंतर्गत भागात राहून नुकसान करतो. महाराष्ट्रात निरनिराळ्या पिकांवर सुमारे ७५ प्रकारच्या सुत्रकृमींचा प्रादुर्भाव होत असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी पिकांच्या मुळांवर गाठी करणारी(रूट नॉट),सिस्ट निमेटोड्स,रूट लेशन निमेटोड्स,रॅडोफोलस व डँगर या सूत्रकृमींच्या महत्त्वाच्या प्रजाती आहेत.

*लक्षणे:-*
* सुत्रकृमीचा प्रादुर्भाव पिकास मुळाद्वारे होतो.
* मुळांच्या तंतूमध्ये तोंड खुपसून त्यामधील अन्नद्रव्ये घ्यायला चालू करतात.त्यामुळे मुळावर गाठी तयार व्हायला चालू होतात.
* पिकाची वाढ कमी होते वाढ खुंटते, अन्नद्रव्यांची कमतरता दिसु लागते.
* अन्नद्रव्ये पूर्णपणे लागू होत नाहीत.पिक पोषणास अन्नद्रव्ये व पाणी मिळत नाही.
* फुले कळी निघण्याचा कालावधी लांबतो, सेटिंग होत नाही, कळी गळ होते. उबदार बागायती परिसरात जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसुन येतो.

सूत्रकृमी नियंत्रणाचे उपाय सूत्रकृमीनाशकांचा वापर करणे अतिशय खर्चाचे व अवघड असल्याने प्रतिबंधात्मक उपाय योजना फायद्याची ठरते.

*सुत्रकृमी व्यवस्थापन:-*
* पिक लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करून जमीन चागली तापू द्यावी. त्यामुळे जमिनीतील सूत्रकृमींच्या अवस्था सुर्याच्या उष्णतेने मरतात.
* पिकांची योग्य ती फेरपालट करावी. यामध्ये व्दिदल पिकानंतर एकदल पिके घेणे फायद्याचे आढळून आले आहे. जेथेपिकांची फेरपालट करणे शक्य नाही, तेथे उदा. फळझाडांबरोबर आफ्रिकन अथवा फ्रेंच झेंडूसारखी मिश्रपिके घ्यावीत.झेंडूच्या मुळातील रसायनामध्ये सूत्रकृमी नाशकाचे गुणधर्म असल्याने सूत्रकृमींचे नियंत्रण होते.
* मागील पिकाचे अवशेष रोगग्रस्त झाडे वेळीच उपसून शेताबाहेर नष्ट करावीत.
* रोपे अथवा कलमे सूत्रकृमीग्रस्त जमिनीत तयार करू नयेत. 
* जैविक कीड नियंत्रण  ट्रायकोडर्मा प्लस हेक्टरी २० कि. ग्रॅ १००० लिटर पाण्यात मिसळून प्रति फळझाडास समप्रमाणात द्रावण ओतल्यास अथवा कमीत कमी १०० कि. ग्रॅ. चांगले कुजलेल्या शेणखतातून प्रति फळझाडांस समप्रमाणात मातीत मिसळल्यास मुळकूज व सूत्रकृमींचे प्रभावी नियंत्रण होते.
* सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी रोपे अथवा कलमे तयार करताना त्याच प्रमाणे भाजीपाला लागवड, तृणधान्ये, कडधान्ये यांची पेरणी करताना कार्बोफ्युरॉन ३% दाणेदार ६५ कि. ग्रॅ. प्रति हेक्टर या प्रमाणात मातीत मिसळून पाणी द्यावे. फळझाडामध्ये याच सूत्रकृमी नाशकांची दुप्पट मात्रा बहार धरतेवेळी अथवा छाटणी करतेवेळी देऊन हलके पाणी द्यावे.
* भरखतांमध्ये एकरी 100 किलो निंबोळी पेंडीचा समावेश करावा.
संदर्भ:-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी ४१३७२२, जि. अहमदनगर

Comments

Popular posts from this blog

बैलगाडी शर्यत

तुम्हाला कोणती सापळा पिके माहित आहेत? ती कोणत्या किडीच्या नियंत्रणासाठी मदत करतात?

मित्रकीटक शेतीसाठी कसे फायदेशीर आहेत?