माती परिक्षण काळाची गरज - ABM

माती परीक्षण काळाची गरज - ABM

माती परीक्षणामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते. त्यानुसार खतांचा पुरवठा करणे सोपे जाते. खारपट व चोपण जमिनी सुधारण्यासाठी माती परीक्षणाचा फायदा होतो. तसेच पिकांच्या वाढीस आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोल राखता येतो. शेतजमिनीतील प्रातिनिधिक माती नमुना काढून प्रयोगशाळेत रासायनिक पृथक्करण करून घेणे म्हणजे ‘माती परीक्षण’ होय. यात प्रामुख्याने मातीतील मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे प्रमाण तपासले जाते. त्यानुसार पिकांचे आणि खतांचे नियोजन करणे गरजेचे असते.  माती परीक्षणामुळे पिकांना द्यावयाच्या खतांची मात्रा ठरविता येते.  माती परीक्षणासाठी जागा कशी निवडावी 

  • पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी तसेच रासायनिक खते देण्यापूर्वी किंवा खते दिल्यानंतर ३ महिन्यांनी मातीचा नमुना घ्यावा.
  • मातीचा रंग, जमिनीचा खडकाळपणा, उंच-सखलपणा, बागायत किंवा जिरायत स्थिती लक्षात घेऊन  शेतीचे वेगवेगळे भाग पाडावेत. प्रत्येक भागाला विशिष्ट क्रमांक द्यावा.
  • जनावरे बसण्याची, झाडाखालील, कचरा टाकण्याची जागा, पाणी  साचून राहण्याची किंवा बांधाजवळची जागा नमुना घेण्यासाठी निवडू  नये. 
  • नमुना तपासणीसाठी देताना द्यावयाची माहिती

  • शेतकऱ्यांचे नाव
  • गाव
  • शेताचा सर्व्हे किंवा गट क्रमांक
  • नमुना घेतल्याची तारीख
  • जमिनीचा प्रकार (वाळू/पोयटा/चिकणमाती/क्षारयुक्त/विम्ल/चुनखडीयुक्त)
  • मागील हंगामात घेतलेले पीक व पुढील हंगामात घ्यावयाची पीक पद्धती
  • मातीचा नमुना घेताना घ्यावयाची काळजी

  • पिकांची कापणी झाल्यानंतर मशागतीपूर्वी मातीचा नमुना घ्यावा.
  • शेताच्या चारही बाजूंनी बांधापासून किमान १ मीटर अंतर सोडून नमुना घ्यावा.
  • शेतात पीक असेल, तर २ ओळींतील जागेतून मातीचा नमुना घ्यावा. 
  • जमिनीला खत पुरवठा केला असल्यास, अडीच ते ३ महिन्यांनंतरच मातीचा नमुना घ्यावा. 
  • प्रयोगशाळेत माती नमुने पाठवण्यासाठी खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर करू नये.
  • माती परीक्षण अहवालातून समजणाऱ्या बाबी शेतातील मातीत असणाऱ्या नत्र, स्फुरद, पालाश, लोह, जस्त, मॅंगनीज, तांबे या मूलद्रव्यांची तपासणी केली जाते. तसेच मातीचा सामू, क्षारता, विद्युत वाहकता, सेंद्रिय कर्ब, मुक्त चुनखडी, आर्द्रतेचे प्रमाण तपासले जाते.  माती परीक्षण केल्यामुळे होणारे फायदे 

  • जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते. त्यानुसार खतांचा पुरवठा करणे सोपे जाते.
  • खारपट व चोपण जमिनी सुधारण्यासाठी माती परीक्षणाचा फायदा होतो. 
  • पिकांच्या वाढीस आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोल राखता येतो.
  • माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करून पीक उत्पादनात वाढ  होते. खतांची बचत होण्यास मदत मिळते. 
  • जमिनीची सुपीकता टिकवून उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी  योग्य त्या उपाययोजना करता येतात. 
  • माती नमुने घेण्याची पद्धत 


  • माती परीक्षणासाठी हेक्टरी १०-१२ ठिकाणी खड्ड्यातील नमुने घ्यावेत. 
  • नमुना घेण्यासाठी इंग्रजी व्ही आकाराचा १५ ते ३० सेंमी खोल खड्डा घ्यावा. खड्ड्यातील माती बाहेर काढून टाकावी. 
  • नमुना चाचणीसाठी खड्ड्याच्या २-३ सेंमी कडेची माती वरून खालपर्यंत काढावी. सर्व खड्ड्यातील माती 
  • गोळा केल्यानंतर त्यातील काडीकचरा, दगड, पालापाचोळा वेगळे करावे. 
  •  गोळा केलेल्या सर्व मातीचा ढीग करून त्याचे समान ४ भाग करावेत. समोरासमोरील २ भागांची माती काढून टाकावी आणि उर्वरित मातीचा ढीग करावा. त्याचे पुन्हा ४ समान भाग करावेत. पुन्हा समोरासमोरील दोन भागांची माती काढून टाकावी. ही कृती माती अर्धा ते १ किलो राहीपर्यंत करावी.
  • त्यानंतर ती माती सावलीत वाळवावी. माती कापडी पिशवीत भरावी. आणि प्रयोगशाळेत परीक्षणासाठी पाठवून द्यावी.
  • माती परीक्षणावरून खतांची शिफारस 

  • जमिनीमधील नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचे प्रमाण व पिकांची इतर अन्नद्रव्यांची गरज पाहून खतमात्रेची शिफारस केली जाते. मातीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण हे कमी, मध्यम व जास्त या वर्गवारीत केले जाते.
  • जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्त कमी असल्यास खतमात्रा ५० टक्के आणि कमी असल्यास २५ टक्क्यांनी वाढवावी. तसेच अन्नद्रव्यांचे प्रमाण अत्यंत जास्त किंवा जास्त असेल तर खतमात्रा २५ टक्क्यांने कमी करावी. जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण मध्यम किंवा थोडेसे जास्त असल्यास मात्रेत बदल केला जात नाही.  
  • वर्गीकरण सेंद्रिय कर्ब (ग्रॅम/किलो) उपलब्ध नत्र (किलो/हेक्टर)उपलब्ध स्फुरद (किलो/हेक्टर) उपलब्ध पालाश (किलो/हेक्टर)
    अत्यंत कमी   २ पेक्षा कमी  १४० पेक्षा कमी७ पेक्षा कमी १०० पेक्षा कमी
    कमी२.१ ते ४  १४१ ते २८०  ७.१ ते १४   १०१ ते १५०
    मध्यम ४.१ ते ६  २८० ते ४२० १४.१ ते २१  १५१ ते २००
    थोडेसे जास्त  ६.१ ते ८   ४२१ ते ५६०    २१.१ ते २८ २०१ ते २५०
    जास्त ८.१ ते १०  ५६१ ते ७०० २८.१ ते ३५ २५१ ते ३००
    अति जास्त१० पेक्षा जास्त ७०० पेक्षा जास्त  ३५ पेक्षा जास्त ३०० पेक्षा जास्त

    पोषक अन्नद्रव्यांची उपलब्धता व खतांची मात्रा  मातीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण जर दिलेल्या पी.पी.एम. पेक्षा कमी असेल, तर तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे उपाययोजना कराव्यात. 

    अन्नद्रव्ये   मातीमधील उपलब्धता (पी.पी.एम.)अन्नद्रव्यांचा बाह्य स्रोत खतांची मात्रा (किलो/हेक्टर)
    लोह (आयर्न)४.५ पेक्षा कमीआयर्न सल्फेट (२० टक्के लोह असलेले) १० ते १५
    आयर्न चिलेट (ईडीटीए-१२ टक्के लोह असलेले)  १५ ते २०
    मंगल (मॅंगनीज)२.० पेक्षा कमीमॅंगनीज सल्फेट (२८ टक्के मॅंगनीज असलेले)  ५ ते १०
    जस्त (झिंक) ०.६ पेक्षा कमी झिंक सल्फेट (३६ टक्के झिंक असलेले)  २५ ते ३०
    तांबे (कॉपर)०.२ पेक्षा कमीकॉपर सल्फेट (२५ टक्के कॉपर असलेले) ५ ते १०
    बोरॉन०.५ पेक्षा कमीबोरॅक्स (११ टक्के बोरॉन असलेले)१० ते १५
    मोलाब्द (मॉलिब्डेनम)०.०५ पेक्षा कमीसोडिअम मॉलिब्डेट (३८ टक्के मॉलिब्डेनम असलेले)१ ते ५.२
    अमोनिअम मॉलिब्डेट (५४% मॉलिब्डेनम असलेले)  १ ते १.५

    Comments

    Popular posts from this blog

    🌧️ खरीपाच्या तयारीसाठी बिजप्रक्रियेची वेळ आलीय!

    बैलगाडी शर्यत

    तुम्हाला कोणती सापळा पिके माहित आहेत? ती कोणत्या किडीच्या नियंत्रणासाठी मदत करतात?